आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अभिजात दर्जा मागण्याचा मराठी भाषेलाही अधिकार : शरद पवार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 18, 2024
Spread the love

पुणे : संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे, ही वस्तुस्थिती नाही. संस्कृतच्या पूर्वकालावधीतही मराठीतून लिखाण झाले आहे, असे अनेक शिलालेखांमधून आढळून आले आहे. मराठी भाषेला समृद्ध पूर्व इतिहास आहे. मराठी भाषेच्या माध्यमातून प्रचंड ज्ञान आणि लिखाण निर्माण झाले आहे. अभिजात दर्जा मागण्याचा अधिकार मराठी भाषेला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी ‘विठू माऊली माझी‌’ हा रौप्य महोत्सवी कार्यक्रम आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आयोजित स्पर्धेतील कवितांचा समावेश असलेल्या ‘मराठी अभिजात‌’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.

पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ उद्योगपती विठ्ठल मणियार, खासदार सुप्रिया सुळे, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, वरिष्ठ पत्रकार श्रीराम पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखक-इतिहास तज्ज्ञ संजय सोनवणी उपस्थित होते.

यावेळी ‘संत शेख महंमद‌’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी संत शेख महंमद यांचे वंशज आरिफभाई शेख उपस्थित होते. मराठी भाषेसाठी ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेखही शरदचंद्र पवार यांनी यावेळी केला.

सुरुवातीस लक्ष्मीकांत खाबिया यांनी संस्थेच्या 27 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत संस्थेतर्फे महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. श्रीराम पवार म्हणाले, मराठी ही जैव पद्धतीने विकसित झालेली भाषा आहे.

ती अभिजात आहे हे सांगण्याची गरज नाही तर हे सत्य आहे. संजय सोनवणी म्हणाले, मराठी भाषेचा प्रवास अथक आहे. काळानुरूप भाषा बदलत गेली तरी ती प्रवाही राहणे आवश्यक आहे.