आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये देशातील दहा जैन तीर्थस्थळांचा समावेश

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 18, 2024
Spread the love

पुणे : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने मध्ये जैनधर्मियांच्या श्री सम्मेद शिखरजीसह देशातील १० व राज्यातील जैन मंदिर-कुंभोज, जैन मंदिर एलोरा लेणी-छत्रपती संभाजीनगर, जैन मंदिर- मांगीतुंगी (जि. नाशिक) या तीन तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रथमच जैन धर्मियांना यात्रेसाठी लाभ मिळणार असुन जैन बांधवात आनंदाची भावना आहे. जैन धर्मियांसाठी पूजनीय व श्रद्धेय अशा श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्रासह देशातील १० तर राज्यातील तीन जैन धर्मियांच्या तीर्थस्थळांचा समावेश योजनेत करण्यात आला आहे.

विविध सामाजिक जैन संघटना, संस्थांच्या वतीने मुख्यमंत्री व महाराष्ट्र शासना बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील सर्व धर्मियांसाठी ६० वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी राज्य शासना कडून योजना जाहीर करण्यात आली आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १४ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला. त्यात भारतातील एकूण ७३ व महाराष्ट्र राज्यातील ६६ विविध धर्मियांच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. आयुष्यात एकदा तरी पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची प्रत्येकाची सुप्त इच्छा असते.

सर्वांना धर्मयात्रेचा लाभ मिळावा यासाठी राज्य शासनाने आपल्या योजनेत जैन धर्मीयांच्या तीर्थस्थळांचा समावेश केला आहे. जैन धर्मियांना प्रथमच अशा यात्रेच्या माध्यमातून शासनाकडून धर्मयात्रेचा लाभ होणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देण्याची व्यवस्था राज्य सरकार करणार आहे. लाडकी बहीण योजनेप्रमाणे ही योजनाही मध्य प्रदेशच्या धर्तीवर आखण्यात आली आहे.

यादीतील तीर्थस्थळांपैकी एका तीर्थस्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला योजनेचा एकवेळ लाभ घेता येईल. त्यासाठी प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती ३० हजार रुपये इतकी राहील. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास सर्व बाबींचा समावेश असेल.

  • 1 – श्री सम्मेद शिखरजी (गिरीडोह) झारखंड.
  • 2 – पावापुरी-बिहार.
  • 3 – गिरनार – गुजरात.
  • 4 – उदयगिरी- मध्य प्रदेश.
  • 5 – दिगंबर जैन लाल मंदिर – दिल्ली.
  • 6 – रणकपूर-राजस्थान
  • 7 – गोमटेश्वर- श्रवणबेळगोळ
  • 8 – कुंभोज – महाराष्ट्र
  • 9 – जैन मंदिर एलोरालेणी – छत्रपती संभाजीनगर
  • 10 – जैन मंदिर- मांगीतुंगी (जि. नाशिक)