आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भगवान महावीरांचे विचार जगाला युद्धमु्क्त करणारे

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 19, 2024
Spread the love

पुणे : युद्धमुक्त जग बनवण्याची क्षमता ही भगवान महावीरांच्या विचारांमध्येच आहे. अहिंसा व प्रेम सांगणारा त्यांचा विचारच प्रेरक आहे, असे प्रतिपादन आचार्य चंदनाजी यांनी केले.

वर्धमान प्रतिष्ठान शिवाजीनगर जैन स्थानकाच्या वतीने आचार्य चंदनाजी यांच्या चातुर्मास प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी साध्वी शिलापीजी, साध्वी विभाजी, साध्वी मनस्वीजी उपस्थित होत्या.

या प्रसंगी सुमतीलाल लोढा यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी बीजेएसचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आचार्य चंदनाजी उपस्थितांना उद्बोधन करताना म्हणाल्या, संपूर्ण विश्वाशी मैत्री करा हा संदेश भगवान महावीर यांनी दिला.

आजच्या काळात जगासाठी सर्वात आवश्यक असा हा संदेश आहे. अनेकदा देशांमध्ये युद्ध होतात, हिंसाचार होतो आणि त्यानंतर त्याचे संहारक परिणाम दिसले की युद्धबंदी होते. भगवान महावीरांचा संदेश सर्वदूर पोहोचला तर युद्धानंतर युद्धबंदी करण्याऐवजी युद्ध होण्याची वेळच येणार नाही.

युद्धमुक्त जग आपल्याला बनवायचे असेल तर महावीरांचा संदेश आत्मसात करावा लागेल. त्या पुढे म्हणाल्या, भारतात जैन व बौद्ध धर्म हे तसे समकालीन आहेत. परंतु बुद्ध धर्म स्वीकारलेले दहा देश आपल्याला दिसतात. मात्र जैन धर्मियांचे म्हणून एक स्वतंत्र गावसुद्धा बनू शकलेले नाही. अडीच हजार वर्षांत हे होऊ शकले नाही याची खंत वाटते.

जैन धर्मियांचे पालिताना हे तीर्थक्षेत्र आहे तिथे शेकडो मंदिरे आहेत. परंतु जैन धर्मियांची मुले शिक्षण घेऊ शकतील अशी शाळाच तिथे नव्हती. आता जेव्हा तिथे जैन धर्माच्या पुढाकाराने शाळा सुरू झाली आहे तेव्हा जैन धर्माचेच नव्हे तर हिंदू, मुस्लिम धर्माचीही मुले तिथे शिकत आहेत.

नवकार मंत्र आदी म्हणून संस्कारित होत आहेत. त्या संस्कारामुळे त्यांचे कुटुंबदेखील अहिंसक आणि शाकाहारी बनत आहेत. असे प्रयत्न ठिकठिकाणी होणे गरजेचे आहे. साध्वी शिलापीजी म्हणाल्या, चातुर्मास म्हणजे स्वतःशीच संवाद साधण्याची सुंदर संधी असते. त्यादृष्टीने आचार्य चंदनाजी यांचे विचार आपण ग्रहण करावेत.

आचार्य चंदनाजी यांनी भगवान महावीर यांचे विचार आत्मसात केलेले आहेत. कुणाशीही शत्रुत्व नाही हे भगवान महावीरांचे एक सूत्र आपण जीवनात आत्मसात केले तरी देखील जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून येईल. स्पिरिच्युअल सांयटिस्ट अशी आचार्य चंदनाची यांची ओळख आहे. 32 देशांमध्ये त्यांचे काम विस्तारलेले आहे.

त्यामुळे त्यांच्याकडून विचारामृत ऐकायला मिळणे हे आपले भाग्य आहे. त्या पुढे म्हणाल्या, प्रेम हाच आपला मूळ स्वभाव आहे आणि आपला स्वभाव हाच धर्म आहे. त्यामुळे धर्म शाश्वत असतो. परंपरा बदलत राहतात. परंतु, बदलत्या परंपरांनाच धर्म समजल्यामुळे आजचा युवक संभ्रमित होत राहतो.

त्यामुळे वर्धमान प्रतिष्ठान सारखी केंद्रे ही युवकांसाठी प्रेरणेची केंद्र बनायला हवीत. तर्कपूर्ण आणि शाश्वत धर्म युवकांपर्यंत घेऊन जाणे हे आपले काम आहे. या व्याख्यानमालेचे आयोजन वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड, सचिव जितू तातेड, अर्चना लूनावत यांनी केले. या कार्यक्रमासाठी पुण्यातील सर्व जैन स्थानके, मंदिरे व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते.