कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना कोंढवा भागात घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हत्यारे हवेत फिरवून ‘इसको बचाने कोई आया तो उसको मार डालेंगे’ असे बोलून धमकी देवून परीसरात दहशत निर्माण केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महंमद प्यारे शेख (२७, रा. अश्रफनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अरबाज ऊर्फ लॅब याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शेख याने याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अरबाज याच्या साथीदाराचे घर महंमद याने पोलिसांना दाखवल्याचा संशय आरोपींना होता. यामुळे आरोपी त्याच्यावर चिडले होते. गुरुवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास शेख कोंढव्यातील कोणार्क पुरम सोसायटीच्या परिसरातून निघाला होता. तेथील रिक्षा थांब्याजवळ आरोपी अरबाज, साथीदारांनी त्याला अडवले आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
‘तू तबरेजचे घर पोलिसांना का दाखवले? ‘अशी विचारणा करून आरोपींनी शेखवर कोयत्याने वार केले, यात तो जखमी झाला. जोर-जोरात आरडा ओरडा करून रस्त्यावरुन जाणारे लोक मदती करीता आले असता हातातील हत्यारे हवेत फिरवून ‘इसको बचाने कोई आया तो उसको मार डालेंगे’ असे बोलून धमकी देवून परीसरात दहशत निमार्ण केली.
पोलिसांनी ताहिर इफ्तेकार शेख, (वय १८ वर्षे, रा. गौतम बुध्द सोसायटी, कोंढवा,) अरबाज इलीयासखान, (वय २५ वर्षे, रा.आश्रफनगर गल्ली नं. २. कोंढवा) यांना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. हा तपास सहा. पो. निरीक्षक राजेश उसगांवकर करीत आहेत.
