आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जीपॅट परीक्षेत डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे यश

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 1, 2024
Spread the love

भुम : भारत सरकार द्वारे घेतल्या जाणाऱ्या जीपॅट-२०२४ या राष्ट्रीय स्पर्धा परीक्षेमध्ये आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व याद्वारे स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा यावर्षीही विद्यार्थ्यांनी कायम ठेवली आहे.

फार्मसी शिक्षण क्षेत्राच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. या स्पर्धेमध्ये शिवराज जाधव या विद्यार्थ्याने देशामध्ये ३३२ वा क्रमांक मिळवला आहे तसेच भावना चौधरी, ब्रम्हदेव सुंटे, वैभवी कुलकर्णी, ऋतुजा तराळ, रोहित राठोड, प्राची गोरे, रेणुका लोळगे, प्रसाद पवार आणि स्नेहल सावळे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.

या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे, अशी प्रतिक्रिया उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिली आहे. या परीक्षेच्या तयारी संदर्भात प्रा. पवनकुमार वानखडे यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यासाठी परिश्रम घेतले.

महाविद्यालयातील चार वर्षांचे शिक्षण व वानखडे सर यांचे मार्गदर्शन हेच आमच्या यशाचे गमक आहे असे यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संकुल संचालक रियर ॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त) आणि प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी अभिनंदन केले. संस्थेचे विश्वस्त तेजस पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केले.