आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गुन्हेगारांचे धाबे दणाणले, पोलिसांना नवे अस्त्र

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 2, 2024
Spread the love

पुणे : शहरासह परिसरात गुन्हे करणाऱ्या, तसेच वाँटेड असलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी शहरात लवकरच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बेस (एआय) कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामध्ये एआय आधारित ‘फेस रिकग्नायझेशन’ यंत्रणेमुळे शहरात दाखल झालेल्या सराईत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यास मदत होणार आहे. तसेच गुन्हेगारांच्या संशयित हालचालींवर देखील पाळत ठेवली जाणार आहे.

शहरात असे आधुनिक कॅमेरे बसवण्यासाठी शासनाकडून ४३५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शहरात यापूर्वी बसविलेले १३०० कॅमेरे आणि नवीन मंजूर झालेले २ हजार ८८६ कॅमरे असे सर्व मिळून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित कॅमरे मंजूर केले आहेत. विशेष म्हणजे शहरातील यापूर्वीचे कॅमेरे देखील ‘एआय’ धर्तीवर अपग्रेड केले जाणार आहेत.

काळानुसार गुन्हेगार देखील हायटेक झाले आहेत. त्यामुळे पोलिसांसमोर अनेकदा आव्हान निर्माण होत आहे. काही प्रकरणांमध्ये आरोपी एका शहरात गुन्हा करून दुसऱ्या शहरात वास्तव्यास असल्याचेही समोर आले आहे.

मात्र, असे गुन्हेगार शहरात आले तरी त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून आरोपींना पकडण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून प्लॅनिंग केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून आता फेस रिकग्नायझेशन यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

अनेकदा बसस्टैंड, रेल्वेस्टेशन परिसरात मोबाइल चोरी, पाकीट मारीच्या घटना घडतात. यासह प्रवासामध्ये गुंगीचे औषध देऊन सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली जाते. प्रमुख शहरांना दहशतवादी हल्ल्याचा धोका असतो. गर्दीच्या ठिकाणी अशा हालचाली होतात. अशा ठिकाणाहून गुन्हेगारांना पळ काढण सोपे असते. परंतु या यंत्रणेची अंमलबजावणी केल्यास हा धोका कमी होणार आहे.