डॉ. सुरेश खाडे : घरेलू कामगारांना गृहोपयोगी वस्तुसंचाचे वाटप
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे केवळ १ रुपयांमध्ये नोंदणी करता येत असून, या मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता कामगारांनी नोंदणी करावी, असे आवाहन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.
चिंचवड येथे रामकृष्ण मोरे नाट्यगृहात आयोजित घरेलू कामगारांना गृहउपयोगी वस्तुसंच वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, सदाशिव खाडे, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, उप आयुक्त अभय गिते आणि विविध घरेलू कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डॉ. खाडे म्हणाले, “घरेलू कामगारांना या गृहोपयोगी वस्तुसंचाच्या माध्यमातून मायेची ऊब देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. घरेलू कामगारांना देण्यात येणाऱ्या लाभांसाठी शासनाने ५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
मंडळामार्फत घरेलू कामगार महिलांना दोन अपत्यांपर्यंत ५ हजार रुपये प्रसूती लाभ, सन्मानधन योजनेत वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत पात्र घरेलू कामगारांना १० हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येतात. तसेच संसारोपयोगी भांडी, अंत्यविधीसाठी वारसास २ हजार रुपये सहाय्य देण्यात येते.”
बांधकाम कामगारांनाही विविध लाभ देण्यात येतात. नोंदणी सुलभतेने होण्यासाठी तालुकास्तरावर ३०४ सेतू केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा दीड हजारांवरून तीन हजार करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे सांगून, “शासन कामगारांच्या पाठीशी आहे,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
श्रीमती सिंघल म्हणाल्या, “घरेलू कामगारांना हक्काचे घर, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था, महिलांच्या आरोग्याची काळजी, तसेच घरेलू कामगारांना पेन्शनची सोय करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
घरेलू कामगार मंडळाकडे अधिकाधिक महिलांनी नोंदणी करावी व इतरांनाही नोंदणीसाठी प्रेरित करावे. त्यामुळे नोंदणीकृत कामगारांना लाभ देणे शक्य होईल.” मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या लाभांसाठी नोंदणीचे नुतनीकरण आवश्यक असल्याचे सांगून, “हे शासन लोकाभिमुख असून कामगारांना मदतीचा हात देत आहे,” असे त्या म्हणाल्या कामगार मंत्री यांच्या हस्ते जिल्ह्यातील १ हजार ८२० घरेलू महिला कामगारांना गृहउपयोगी वस्तुसंचाचे वितरण करण्यात आले. यावेळी आमदार उमा खापरे व अमित गोरखे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात शैलेंद्र पोळ यांनी मंडळामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.
