सेवा सप्ताहानिमित्त शाळांना सात संगणक भेट
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट च्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा मंदिरात नवरात्र उत्सव सुरु आहे. या नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री देवीसूक्तम मंत्राचे सामुहिक पठण करण्यात आले. यासोबतच माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट व लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड च्या वतीने नवरात्र उत्सवात राबविण्यात येत असलेल्या सेवा सप्ताह अंतर्गत आज विविध गरजू शाळांना ७ रिसायकल्ड संगणक भेट म्हणून देण्यात आले.
नवरात्र उत्सवात शुक्रवारी हिरवा रंग होता. त्यामुळे सर्व महिला हिरव्या रंगाची साडी घालून या श्री देवीसूक्तम मंत्र पठणाच्या कार्यक्रमास उपस्थित होत्या. यावेळी भारती भंडारी, लीना भंडारी, रुपाली चोरडीया, अचला भंडारी, आरती सरनोत, रेखा खंडेलवाल, शिल्पा कटारिया, सुजाता गोयल, पूनम ओसवाल, किरण खंडेलवाल, स्वाती पोद्दार आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
या नवरात्र उत्सवात अभिषेक, आरती, नवचंडी महायज्ञ, माता की चौकी, भजन, श्री सुक्त पठण, कन्यापूजन, नवदुर्गा सन्मान पुरस्कार सोहळा, श्री देवी सूक्तम् मंत्र सामूहिक पठण, आदी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
माँ आशापुरा ही राजस्थानमधील अनेकांची कुलदेवता आहे. महाराष्ट्रात आशापुरा मातेचे मंदिर नसल्याने पुणे आणि परिसराबरोबरच महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या परंतु, मूळच्या राजस्थानमधील लोकांना लग्न कार्यानंतर अथवा इतर धार्मिक कार्यक्रमासाठी राजस्थानमध्ये जावे लागत असे.
नागरिकांना इथेच आशापुरा मातेचे दर्शन घेता यावे म्हणून विजय भंडारी आणि परिवाराने गंगाधाम चौकाजवळ माँ आशापुरा मातेचे भव्य मंदिर बांधले. याठिकाणी होत असलेला नवरात्र उत्सवदेखील खूप वेगळ्या स्वरुपाचा आणि समाजाला दिशा देणारा आहे. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात याठिकाणी दर्शनासाठी येतात.



















