आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुण्यातील विविध अपघात दोन दिवसांत चौघांचा मृत्यू

maharashtra jain warta • Maharashtra News Networks • February 15, 2025
Spread the love

पुणे : पुणे शहरात गेल्या दोन दिवसांत विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे अपघात सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौक, पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती, मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग आणि नगर रस्ता परिसरात घडले.

पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. विजय शंकर रेळेकर (५५, रा. देवराई, आंबेगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी रेळेकर यांचे भाऊ गणेश रेळेकर यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

बुधवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास विजय रेळेकर हे पुणे-सातारा रस्त्यावरून जात असताना पद्मावती परिसरातील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सदाशिव पेठेतील ना. सी. फडके चौकात भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. रूपचंद सदाशिव घोणे (८०, रा. शाहू महाविद्यालय रस्ता, पर्वती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

बुधवारी रात्री आठच्या सुमारास रूपचंद घोणे हे दुचाकीवरून पर्वतीकडे जात असताना भरधाव कारने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या घोणे यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कारचालक अपघातानंतर फरार असून पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वडगाव उड्डाणपुलाजवळ सेवा रस्त्यावर उभ्या असलेल्या खासगी बसवर दुचाकीस्वार आदळून मृत्यूमुखी पडला. शुभम शुक्ला (३६, रा. अलंकाकृती सोसायटी, बाणेर-सूस रस्ता) असे मृत तरुणाचे नाव आहे.

गुरुवारी मध्यरात्री १.३० च्या सुमारास शुभम शुक्ला हे बाह्यवळण मार्गावरून जात असताना वडगाव उड्डाणपुलाजवळ सेवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या खासगी बसवर त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली.

यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. धोकादायक पद्धतीने बस उभी केल्याने बसचालक दिगंबर शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाघोली परिसरात एका अज्ञात वाहनाच्या धडकेत विठ्ठल बालाजी जमदाडे (४६, रा. एसटी कॉलनी, वाघोली, नगर रस्ता) यांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री विठ्ठल जमदाडे रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारही अपघातांप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले असून, अपघातानंतर फरार झालेल्या वाहनचालकांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहन चालवताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.