आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

गजा मारणे प्रकरणात नवा ट्विस्ट

maharashtra jain warta • Maharashtra News Networks • March 3, 2025
Spread the love

पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरळीधर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणात सोमवारी नवा ट्विस्ट पहायला मिळाला. कुख्यात गुंड गजा मारणे, रुपेश मारणे यांनी देवेंद्र जोग यांना मारहाण करण्यास चिथावणी दिली असून त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर मोक्का अंतर्गत कारवाई केली.

दरम्यान, फिर्यादी देवेंद्र जोग यांनी आपल्याला झालेली मारहाण ही क्षणिक रागातून झाल्याचे व कोणीही चिथावणी दिली नसल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने गजा मारणे याची न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी केली. यापूर्वी अटक केलेल्या तिघांना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

फिर्यादी देवेंद्र जोग यांनी आज वकिलासह न्यायालयात हजर राहून एक प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी आपल्याला ३ ते ४ जणांनी मारहाण केली. मला मारहाण होण्यापूर्वी तसेच मारहाण होते वेळी व मारहाण झाल्यानंतर इतर कोणत्याही लोकांनी कोणतीही चिथावणी दिली नाही.

तसेच त्यांचे व्यतिरिक्त इतर कोणीही घटनास्थळी हजर देखील नव्हते. ही घटना क्षणिक रागातून झालेली असल्याने मी केवळ ४ जणांविरुद्ध तक्रार केली होती. माझे समक्ष कोणाच्याही सांगण्यावरुन मला मारहाण केली नव्हती, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

त्यामुळे या प्रकरणात नवे वळण मिळाले आहे़ पोलिसांनी दाखल केलेला खुनाचा प्रयत्न आणि मोका अंतर्गत कारवाई याचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, गुन्हे शाखेने कुख्यात गुंड गजा मारणे याला आज न्यायालयात हजर केले.

आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती देताना न्यायालयास सांगण्यात आले की, गुन्ह्याचे घटनास्थळावरील व परीसरातील सीसीटीव्ही फुटेज सायबर तज्ञांचे मदतीने जप्त करण्यात आले.
न्यायालयीन कोठडीतील तिन्ही आरोपींची ओळख परेड घेण्यात आलेली आहे.

दोन दुचाकी व २ फॉर्च्युनर कार जप्त करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे तपास करण्यात आला आहे. न्यायालयीन कोठडीतील तिन्ही आरोपींना मोका न्यायालयाच्या प्रोडक्शन वॉरंटने ताब्यात घेऊन कोर्टात हजर करण्यात आले आहे.

यावेळी पोलिसांनी चारही आरोपींची १० दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. गुन्ह्यातील तीन आरोपी व गजा मारणे यांना समोरासमोर बसवून गुन्ह्याचा तपास मोका कायद्यान्वये करणे आहे.

चौघेही सराईत आहेत. अन्य वाहने जप्त करायची आहेत. आरोपींच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण चालू असून तपासादरम्यान उपलब्ध होणाऱ्या माहितीचे आधारे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे काय याबाबत तपास करायचा आहे.

आरोपींची संघटीत टोळी आहे. या टोळीने खून, खुनाचा प्रयत्न खंडणी, जबरी चोरी अशा प्रकारचे गुन्हे करुन बेकायदेशीरपणे स्थावर अथवा जंगम मालमत्ता प्राप्त केली आहे. याबाबत सखोल तपास करायचा आहे.

आरोपींची जनमानसात प्रचंड दहशत आहे. त्यामुळे तपास करताना साक्षीदार व फियार्दी हे प्रचंड दबाबाखाली असल्याचे दिसून येत आहे. आरोपींच्या वतीने अ‍ॅड.विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तीवाद केला की, प्रथमपासूनच हा खोटा गुन्हा आहे.

गुन्हेगारी कमी करण्याच्या प्रयत्नात मारणेवर पूर्वीचे गुन्हे आहेत, म्हणून गुंतवण्यात आले. घटनास्थळी मारणे हजर नव्हता. त्याचे पासून ५०० मीटरवर घटना घडली. त्यामुळे चिथावणी देण्याचा प्रश्न येतच नाही.

फिर्यादी स्वत: यांचे वकिलामार्फत हजर होऊन या युक्तीवादाला पुष्टी दिली आहे. खोट्या केसमुळे लवकरच जामिनासाठी मागणी करणार आहोत. न्यायालयाने तीनही आरोपींना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. गजा मारणे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.