बुलियन मार्केट: दोन कोटीची खंडणी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : एका हिरे व्यापार्याचे अपहरण करुन दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्यापार्याचे बुलियन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक केली असल्याने सध्या त्याचा व्यवसाय तोट्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपहरणकर्त्यांनी त्यांच्याच मोबाईलवरुन सोमवारी सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी फोन करुन दोन कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर आता १२ तासांहून अधिक काळ उलटून गेला तरी त्याबाबत कोणती बाब समोर आलेली नाही.
याबाबत या व्यापार्याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. त्यांचे पती आणि त्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी सोमवारी सायंकाळी सॅलिसबरी पार्क येथील कारनेशन प्री स्कुल येथे गेले होते. ते मुलीला शाळेतून बाहेर घेऊन आले. पत्नीला म्हणाले तुम्ही कारने घरी जा, मी कॅम्पमध्ये मित्राला भेटून येतो, असे सांगून ते अॅक्टीव्हा दुचाकीवरुन गेले.
त्यांच्या पत्नी मुलीला घेऊन घरी आल्या. त्यानंतर सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी त्यांना पतीच्या मोबाईलवरुन फोन आला. फोनवर दुसरेच कोणीतरी बोलत होते. त्याने ‘‘मैने आप के पती को उठाया है. दो करोड तयार रखो, आप के ससूरजी को बोलो, दोन घंटेमे फोन करेंगे,’’ असे म्हणून त्याने पैसे दिले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर या महिलेने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने याचा तपास सुरु केला. अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्यासह वरिष्ठ पोलिसांनी यात लक्ष घातले.
पोलिसांनी या हिरे व्यापार्याच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. ते नवले पुलाजवळ आढळले. त्या परिसरात शोध घेतल्यानंतर त्यांची अॅक्टिव्हा दुचाकी आढळून आली. त्यानंतर अपहरणकर्त्यांकडून कोणताही फोन आला नाही़ त्यांचा मोबाईल बंद करण्यात आला आहे. शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा, बिबवेवाडी पोलिसांसह सर्व पोलीस या हिरे व्यापार्याचा तपास करीत आहेत.
हिरे घेऊन त्याचे दागिने बनविण्याचा या व्यापार्याचा व्यवसाय आहे. परंतु, गेल्या काही काळापासून तो तोट्यात सुरु होता. ते बुलियन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक करत असल्याची माहिती आहे.
त्यांनी आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून आपल्याजवळच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले होते. परंतु, सध्या मार्केटमध्ये पडझड झाल्याने ते अडचणीत आले होते. त्यातूनच त्यांना पळवून नेले का यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.
