डॉ. राजेश शहा यांचा गौरवशाली कार्यकाळ कायम
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) च्या २०२५-२०२७ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची निवड आज मुंबईत पार पडली. या निवडणुकीत मुंबईतील जितेंद्र शहा यांची अध्यक्षपदी, तर पुण्यातील सुप्रसिद्ध व्यापारी व जयराज ग्रुपचे संचालक डॉ. राजेश शहा यांची सलग दहाव्यांदा वरिष्ठ उपाध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.
फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फाम) ही राज्यातील सर्व व्यापारी संघटनांची प्रमुख संस्था असून, लहानमोठ्या व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत आहे. शासकीय धोरणे, निर्णय व अध्यादेशांसंदर्भात योग्य पाठपुरावा करून व्यापाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणे हे फामचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
डॉ. राजेश शहा १९९७ पासून फामच्या कार्यकारिणीत कार्यरत असून, २००१ पासून आजपर्यंत सलग वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. व्यापार क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी व व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांची सलग दहाव्यांदा झालेली फेरनिवड त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर व्यापारी समुदायाने दाखवलेल्या विश्वासाचा पुरावा आहे
डॉ. राजेश शहा यांच्या समाजसेवेच्या कार्याची दखल घेत अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी (पीएचडी) प्रदान केली आहे. ते हरिभाई व्ही. देसाई कॉलेज आणि दि पूना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन आहेत. तसेच, एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि श्री पूना गुजराती बंधू समाजाचे मॅनेजिंग ट्रस्टी म्हणूनही ते कार्यरत आहेत.
याशिवाय, ते पुना मर्चंट चेंबरचे सुवर्ण महोत्सवी अध्यक्ष, महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे महासचिव, जनसेवा फाउंडेशनचे खजिनदार आणि पूना हॉस्पिटलचे विश्वस्त या विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत.
शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व व्यापार क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना फाम समाजरत्न पुरस्कार – २०२५ सह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
डॉ. राजेश शहा यांना जमनालाल बजाज पुरस्कार तीन वेळा, तसेच समाज परिवर्तन, समाजरत्न, आदर्श व्यापारी, जीवनगौरव, व्यापार भूषण, राष्ट्रीय ऐक्यता, कर्मवीर आणि बेस्ट बिझनेसमन पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी गौरवण्यात आले आहे.
त्यांच्या या ऐतिहासिक निवडीबद्दल महाराष्ट्रभरातील व्यापारी समुदाय, सामाजिक संस्था आणि विविध संघटनांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
