उदयकांत आंदेकर यांच्या अनाधिकृत फ्लेक्सचा शॉक लावून मुलीचा मृत्यु
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : नाना पेठेतील डोके तालीम परिसरात उभारलेल्या अनधिकृत फ्लेक्सला करंट लागून आठ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवम आंदेकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १ जून रोजी घडली. सायली गणेश डंबे (वय ८, रा. नाना पेठ) ही मुलगी घराजवळ खेळत असताना, उदयकांत आंदेकर चौकात लावलेल्या लोखंडी फलकाला हात लागल्याने तिला विजेचा जोरदार धक्का बसला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
तिला वाचवण्यासाठी धावलेला रुद्र योगेश शिळीमकर (वय ११) हा मुलगाही गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “माजी लोकप्रिय नगरसेवक स्व. उदयकांतजी आंदेकर चौक” असा लोखंडी फलक शिवम उदयकांत आंदेकर आणि त्याच्या साथीदारांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता उभारला होता.
या फलकाला शेजारच्या महावितरणच्या विद्युत खांबातून बेकायदेशीररित्या व निष्काळजीपणे वीजपुरवठा जोडण्यात आला होता. त्यामुळे फलकाच्या लोखंडी खांबात वीज उतरली आणि ही दुर्दैवी दुर्घटना घडली.
सायलीच्या मृत्यूबाबत करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालातही करंट लागून मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ कुलाळ यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव पुढील तपास करत आहेत.
महावितरणकडूनही संबंधित फलकासाठी कोणतीही अधिकृत परवानगी न दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये सायलीने खांबाला स्पर्श करताच ती तिथेच अडकलेली दिसून आली.
तिचा मित्र तिला वाचवण्याचा प्रयत्न करताना करंट लागून दूर फेकला जात असल्याचेही दृश्य फुटेजमध्ये दिसून आले आहे.
