खडक पोलिसांत गुन्हा दाखल : पुण्यातील भवानी पेठेतील प्रकार एकमेकांना मारहाण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यासारख्या शहरात सोसायटीमध्ये कुत्री, मांजरी पाळण्यावरुन वरचेवर भांडणे होत असतात. असे असताना एकाने चक्क सोसायटीच्या पार्किंगमध्ये गायी पाळण्यास सुरुवात केली. त्याला एका ज्येष्ठ नागरिकाने आक्षेप घेतला. त्यावरुन या दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. दोघांनी परस्परांविरुद्ध तक्रारी दिल्या असून खडक पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
इक्बाल मोहमंद गौस (वय ४७, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. र. नं. ३८२/२१) दिली आहे. त्यावरुन अजिम जमीर खान (वय ६७) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी हे एकाच इमारतीमध्ये राहतात. गौस यांनी त्यांच्या सोसायटीच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये विनापरवाना गायी पाळल्या आहेत. त्याविरुद्ध खान यांनी तक्रार अर्ज दिला होता. याचा गौस यांनी जाब विचारल्यावर त्याचा राग येऊन खान यांनी लोखंडी रॉडने मारहाण करुन फिर्यादी यांच्या रिक्षाची तोडफोड करुन ५ हजार रुपयांचे नुकसान केले.
अजिम जमीर खान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी इक्बाल मोहमंद गौस यांना अटक केली आहे. गौस यांनी गायी पाळल्याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्या कारणावरुन गौस याने शनिवारी रात्री साडेआठ वाजता खान यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन लोखंडी रॉडने मानेवर, चेहर्यावर मारुन जखमी केले. या भांडणात खान यांचा मोबाईल व चष्मा गहाळ झाला. खडक पोलीस तपास करीत आहेत.
