आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाला रिक्षात विसरलेला लाखांचा ऐवज

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 22, 2021
Spread the love

डेक्कन पोलिसांची कामगिरी : लग्नातील साड्या आणि तीन लाखांची रोकड परत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : डेक्कन पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षामध्ये विसरलेले कपडे आणि रोख रक्कम असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज परत मिळाल्यामुळे लग्नघरातील कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

   विश्वजित दिलीपराव पवार आणि पंकज माणिकराव जमदाडे (रा. दोघे मणेराजुरी, ता. तासगाव, जि. पुणे) यांनी लग्नासाठी कपडे खरेदी केली. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल शिवसागर येथे कुटुंबीयांसमवेत थांबले. मात्र, ५५ हजार रुपयांच्या साड्या व रोख तीन लाख रुपये असा ऐवज रिक्षामध्ये विसरले. त्यांनी तातडीने डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. मात्र, रिक्षाचा क्रमांक आठवत नसल्याचे सांगितले. 

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन पोलीस ठाण्यातील तपासपथकातील पोलीस अंमलदार दादासाहेब बर्गे व महेश तांबे यांनी डेक्कन पोलीस स्टेशन व विश्रामबाग पोलीस स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेज तपास करीत नाकाबंदी करून रिक्षाचालकाचे नाव, मोबाईल क्रमांक मिळवला. रिक्षाचालक खराडीतील असल्याचे समजले.

तात्काळ त्याच्याशी संपर्क साधून रिक्षामध्ये विसरलेले कपडे व रोख रक्कम मिळवून सहायक पोलीस निरीक्षक पावसे यांच्या हस्ते संबंधितांना परत दिले. पोलिसांच्या तत्परसेवेमुळेच आम्हाला रोख रकमेसह लग्नासाठी खरेदी केलेली कपडे परत मिळाली, असे पवार यांनी सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.