दोन दिवसांचा मतदान जागृती कार्यक्रम : ३९३ नवीन मतदारांची नोंद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
बार्शी: लिओ क्लब बार्शी टाऊनतर्फे नवमतदार नोंदणी अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले. दोन दिवसांच्या मतदान जागृती कार्यक्रमात एकूण ३९३ नवीन मतदारांची नोंद करण्यात आली.
वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेल्या शहर व परिसरातील युवक-युवतींना मतदानाचा राष्ट्रीय अधिकार वेळेत मिळाला पाहिजे, यासाठी लिओ क्लब बार्शी टाऊनच्या तरुणांनी शहरातील सोलापूर रोड परिसरात शुक्रवार (ता. २९) व शनिवार (ता. ३०) असे सलग दोन दिवस नवमतदार नोंदणी अभियान राबवत मतदार जागृती कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. या अभियानात सुमारे ३९३ नवीन मतदार नोंदविण्यात आले.
बार्शीचे तहसीलदार सुनील शेरखाने यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी करण्यात आली. या अभियानांतर्गत नवीन मतदार नोंदणी बरोबरच मतदार यादीतील नाव व स्थलांतर या दुरुस्त्याही यावेळी करण्यात आल्या. ही सर्व प्रक्रिया लिओ क्लबच्या सदस्यांनी ऑन लाईन पद्धतीने एनव्हीएसपी या अधिकृत संकेतस्थळाद्वारे केली आहे. मतदार नोंदणीचा अंतिम दिवस शनिवार (ता.३०) असल्याने नवीन मतदारांनी नोंदणी ठिकाणी उस्फूर्त सहभाग घेत नावनोंदणी केली.
याबाबत अधिक माहिती देताना लिओ क्लब बार्शीचे अध्यक्ष पवन श्रीश्रीमाळ म्हणाले, ‘‘वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरीकांना मतदार नोंदणी करून मतदानाचा राष्ट्रीय अधिकार बजावता यावा यासाठी हे अभियान लिओ क्लबच्या माध्यमातून राबवले. त्यासाठी तहसीलदार शेरखाने, तहसीलचे निवडणूक विभागाचे कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले. दोन दिवसांत सुमारे ३९३ नवीन मतदारांची नोंद करण्यात यश मिळाले.’’
यावेळी अॅड. भगवंत पाटील म्हणाले, ‘‘लिओ क्लबने घटनेने दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी नवीन मतदार नोंदणी अभियान राबवले. ते उत्कृष्ट कार्य आहे. मतदार हाच लोकशाहीचा खरा आधारस्तंभ आहे. त्यांना मतदानाचा पवित्र अधिकार मिळवून देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. सोलापूर रोड हा कामगारवस्तीचा व कष्टकरी जनतेचा परिसर आहे. या परिसरातील नागरिकांना युवकांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी लिओ क्लबने राबविलेले अभियान कौतुकास्पद आहे.
अभियान यशस्वितेसाठी लिओ क्लबचे उपाध्यक्ष यश मेहता, सचिव आदित्य सोनिग्रा, खजिनदार अक्षित परमार, प्रकल्प प्रमुख रोहन मुंडे, स्वराज लोखंडे, मोनील दोशी व सोलापूर रोड परिसरातील रहिवासी ओमकेश जाधव, उमेश नेवाळे, प्रसाद वायचळ यांनी परिश्रम घेतले.
