दोन मोक्का गुन्ह्यांत ४ महिन्यांपासून होता फरार : वारजे पोलिसांनी बार्शीतून घेतले ताब्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : खंडणी उकळण्याच्या गुन्ह्यातील गँगस्टर निलेश घायवळ टोळीतील चार महिन्यांपासून फरार असलेल्या आणि दोन मोक्का गुन्ह्यांतील आरोपीला वारजे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अटक केली आहे.
अमोल दत्तात्रय लाखे (वय २७, रा. ईटखेडा, छत्रपती संभाजीनगर) असे या गुंडाचे नाव आहे. गँगस्टर निलेश घायवळ टोळीवर वारजे माळवाडी तसेच कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यांमध्ये अमोल लाखे हा गुन्हा केल्यापासून फरार होता.
पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना २५ फेब्रुवारी रोजी अमोल लाखे हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे असल्याची माहिती बातमीदारांमार्फत मिळाली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याची खात्री केली.
त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार व सागर कुंभार यांनी बार्शी येथे जाऊन २६ फेब्रुवारी रोजी पहाटे अमोल लाखे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. वारजे व कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड होता.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे व अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार, सागर कुंभार, योगेश वाघ, शरद पोळ, निखील तांबडे, अमित जाधव, महादेव शिंदे, अमोल सुतकर, गणेश शिंदे व सत्यजित लोंढे यांनी केली.

















