महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्ट आणि जिनेंद्र सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. भरतभाई के. शहा (सुयोग ग्रुप) यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दि. १२ मार्च रोजी शुक्रवार पेठ येथील जयराज भवन येथे रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवसेवेची भावना जपणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात एकूण ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यासाठी पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील स्व. मधुकर बिडकर रक्तपेढीचे सहकार्य लाभले. रक्तदानाबरोबरच नागरिकांसाठी श्रवणक्षमता तपासणी मोफत करण्यात आली.यासाठी संस्कारा हिअरिंग सोल्युशनचे आर्णिक शहा यांचे सहकार्य लाभले असून १६५ नागरिकांनी श्रवण तपासणी करून घेतली.
यावेळी “अर्ध्यावरती डाव मोडणारा हार्ट अटॅक” या विषयावर हृदयविकार तज्ज्ञ डॉ. हसमुख गुजर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या हृदयविकाराच्या धोक्यांविषयी माहिती देत त्यांनी हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे, त्यापासून बचावाचे उपाय तसेच आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सीपीआरचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
रक्तदान व आरोग्य शिबिराचे उद्घाटन रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे राम बांगड यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर सुयोग ग्रुपच्या पुष्पाबेन शहा, जयराज ग्रुपचे राजेश शहा आणि डॉ. हसमुख गुजर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ट्रस्टचे उपाध्यक्ष दिलीप मेहता यांनी उपस्थितांचे स्वागत करत स्व. भरतभाई शहा यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात ‘जयराज भवन’ या अत्याधुनिक व भव्य वास्तूची उभारणी झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच सुयोग ग्रुपच्या माध्यमातून दर्जेदार बांधकाम प्रकल्प उभारण्याबरोबरच विविध ठिकाणी जैन मंदिरे व उपाश्रयांची निर्मिती करून जैन समाजाच्या धार्मिक भावना जपण्याचे मोठे कार्य भरतभाईंनी केले, असेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्टसह श्री पुणा गुजराती बंधु समाज, सकल जैन संघ आणि श्री गोडी पार्श्वनाथ टेम्पल ट्रस्ट यांसारख्या नामांकित संस्थांमध्ये त्यांनी विश्वस्त म्हणून कार्य केले असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
या कार्यक्रमाला हंसाबेन शहा, डॉ. सतीश देसाई, डॉ. शैलेश गुजर, डॉ. सम्राट शहा, रोहित शहा, अभिषेक शहा, बिरेन शहा, डॉ. राजेश शहा, सुजस शहा, तिमीर संघवी, चिराग दोशी, सुधीर शहा, भूपेंद्र शहा, अशोक शहा, धिरेंद्र शहा, हरेश शहा, राजेंद्र शहा, हरेश शहा, अनिल वखारिया, मुकेश शहा, पृथ्वीराज धोका, दीपक शहा, विलास शहा तसेच सुयोग परिवारातील कल्पेश शहा, निलेश शहा, राजेंद्र शहा, सुरेंद्र शहा, हितेंद्र शहा यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि ट्रस्टचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्टच्या लोगोचे अनावरण ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य सुमतीलाल शहा, ललित शहा, देवेंद्र शहा आणि अरुण शहा यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रक्तदाते आणि रक्तदान शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टचे उपाध्यक्ष दिलीप मेहता, सुनील शहा, अनिल शहा, नरेंद्र शहा, सुनील शहा, ललित शहा, राजेंद्र शहा, गिरीश शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी ट्रस्टचे सेक्रेटरी सुनील शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले.




















