आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तीन वर्षाच्या चिमण्याला संपविणाऱ्या आईला जन्मठेप

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 20, 2021
Spread the love

सत्र न्यायाधीश अगरवाल यांचा आदेश : कौटुंबिक वादातून विष पाजून केला होता खून

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कौटुंबिक वादातून तीन वर्षाच्या चिमुकल्याला विषारी औषध पाजून संपवल्याची घटना तळवडे (जि. पुणे) येथे 2 ऑगस्ट 2016 मध्ये घडली होती. या प्रकरणाची पाच वर्षे सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने आईला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच 7 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा महत्त्वपूर्ण निकाल सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी सुनावला.

स्वाती विक्रम माळवदकर (वय-25 रा. तळवडे) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तळवडे येथे 2 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याबाबत स्वाती यांचे दीर श्रीकांत माळवदकर (वय-30) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार स्वाती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या एक वर्ष आधी फिर्यादी व त्यांचा भाऊ विक्रम आणि आई-वडील असे सर्व एकत्र राहत होते. परंतु स्वातीला ते मान्य नसल्याने तिचे सासू-सासरे गावी राहू लागले होते. मात्र, सर्वांनी एकत्र रहावे, अशी विक्रम यांची इच्छा होती. त्यामुळे विक्रम आणि स्वाती यांच्यात वाद झाले होते.

घटनेच्या दिवशी स्वाती हिने विक्रम यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे विक्रम यांनी फिर्यादी यांना घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी त्यांना पुतण्या निशिगंध अंथरुणात झोपलेला दिसला. तर त्यांची वहिनी स्वाती ही घरात बेशुद्ध पडलेली होती आणि पंख्याला साडी बांधलेली होती. त्यामुळे फिर्यादी यांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी पुतण्याला मृत घोषीत केले. तर स्वातीवर उपचार करुन तिला डिस्चार्ज देण्यात आला. या खटल्याचे कामकाज सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले.