गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : तीन दुचाक्या हस्तगत, दोन गुन्हे उघड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एका विधीसंघर्षित बालकाकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या वाहनांची किंमत 1 लाख 10 हजार इतकी आहे. त्याच्याकडून खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
पोलिसांनी संगितले की, गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख यांना काशेवाडी परिसरात विधीसंघर्षित बालक चोरीच्या दुचाकी फिरवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता, त्याने अॅक्टीवा दुचाकी सेवन लव चौकातुन चोरल्याचे कबुल केले. ही गाडी चोरी गेल्याची तक्रार खडक पोलीस ठाण्यात दाखल होती. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी दोन वाहने चोरल्याचे सांगितले. ही वाहने हस्तगत करण्यात आली आहेत.
विधीसंघर्षित बालकास दुचाकी फिरवण्याची हौस होती. परंतु, घरी दुचाकी नाही आणि विकत घेऊ शकत नाही म्हणून हौस भागवण्यासाठी वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख, तुषार माळवदकर, सतिश भालेकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
