जादूटोणा केल्याचा आरोप : लोणीकंद पोलिसांत महिलेसह 3 जणांवर खंडणीचा गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एका पुजाऱ्यास तुम्ही भोंदुगिरी करता, जादुटोणा करता, तुमच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करणार असल्याची धमकी देऊन त्यांना १ लाख रुपयांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एका महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखलकरुन दोघांना अटक केली आहे. हा प्रकार २९ सप्टेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान घडला आहे. फिर्यादी हे पुजारी आहेत.
विनायक अधिकराव लावंड आणि अभिजित गोपीचंद दरेकर (दोघेही रा. संभाजीनगर, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद मधील एका ५२ वर्षाच्या पुजारी यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी त्यांना मोबाईलवर फोन करुन ते प्रत्यक्ष भेटून धमकावले. ‘‘तुम्ही भोंदुगिरी करता, जादुटोणा करता, अशी मी तुमच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार करणार आहे. पोलीस तुम्हाला अटक करतील,’’ अशी भिती घातली. तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी दिली. ‘‘तुमची पोलिसांकडे तक्रार करायची नसेल तर तुम्ही मला ५० हजार रुपये द्या, ’’असे धमकावले. त्यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर ४५ हजार रुपयांची एक तोळ्याची सोन्याची अंगठी घेतली. तसेच ५ हजार रुपये घेतले. त्यांच्या या त्रासाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानुसार दोघे जण पैसे घेण्यासाठी या पुजाऱ्यांच्या घरी आले असताना शनिवारी सायंकाळी दोघांना लोणीकंद पोलिसांनी पकडले. पोलीस उपनिरीक्षक टेंगले तपास करीत आहेत.
