आरोग्य विभाग पेपर फुटीप्रकरण : सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून तपास सुरू
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस करत असून या प्रकरणात पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये लातूर सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर आणि शिक्षकांचा समावेश आहे. आजपर्यंत या प्रकरणात 11 जणांना अटक करण्यात आली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय 50, रा. योगेश्वरी नगरी, अंबेजोगाई, जि. बीड) डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (वय 36, रा. एकात्मता कॉलनी, अंबेजोगाई, जि. बीड), उद्धव प्रल्हाद नागरगोजे (वय 36, रा. तितरवणे, ता. शिरूर कासार, जि. बीड), शाम महादू म्हस्के (वय 38 ,रा. पंचशीलनगर, अंबेजोगाई, जि. बीड), राजेंद्र पांडुरंग सानप (वय 51, रा. शामनगर, जि. बीड) यांना अटक करण्यात आली. यापूर्वी अनिल गायकवाड, विजय मुऱ्हाडे, प्रकाश मिसाळ, संदीप भुतेकर, बबन मुंढे, सुरेश जगताप यांना अटक केली आहे, अशी माहिती सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली.
याप्रकरणी आरोग्य विभागाच्या वतीने मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी पुणे सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेपर फुट प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता त्यांना 12 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, उपनिरीक्षक अमोल वाघमारे, संदेश कर्णे, नवनाथ जाधव, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
प्रशांत बडगिरे सूत्रधार…
लातूर विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे. त्याने प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात अंबेजोगाई येथील मनोरुग्णालयातील डॉ. जोगदंड यांच्याकडून 10 लाख आणि शाम म्हस्के यांच्याकडून 5 लाख रुपये घेतल्याचे तपासात समोर आले आहे. बडगिरे याने ही प्रश्नपत्रिका कोठून मिळवली याचा तपास पुणे सायबर पोलीस करीत आहेत.
