लष्कर पोलिसांत फिर्याद : पुण्याच्या कॅम्प परिसरातील एमजी रोडवरील प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुरेसे शिक्षण नाही, त्यामुळे नोकरी नाही, घरची गरीबी, त्यामुळे जगण्यासाठी छोटा मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणार्यांना गल्ली बोळातील गुंडांचा त्रास सहन करावा लागत आहे. गल्ली बोळातील या भाईगिरी करणार्यांचा व्यावसायिकांना वाढता त्रास होत आहे. कॅम्पमधील महात्मा गांधी रोडवरील कपडे विक्रेत्याला एका टोळक्याने पालघनचा धाक दाखवून खिशातील ३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सद्याम असिमुद्दीन हुसेन (वय २३, रा. भवानी पेठ) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लष्कर पोलिसांनी शानु शेख (वय २०) व इतर चौघांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, हुसेन हे महात्मा गांधी रोडवरील सोरगामा यादुकानासमोर फुटपाथवर कपडे विक्री करतात. ७ डिसेंबर रोजी साडेअकरा वाजता ते कपडे विक्री करत असताना शानु शेख व त्याचे ४ साथीदार तेथे आले. त्यांनी हुसेन यांना फुटपाथवर धंदा लावण्याकरीता हप्ता मागितला. तेव्हा हुसेन यांनी त्याला नकार दिला. त्यावर त्यांनी शिवीगाळ करुन पालघनचा धाक दाखवून हुसेन यांच्या पँटच्या खिशातील अंदाजे ३ हजार ५०० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन निघून गेले. सहायक पोलीस निरीक्षक शिळमकर तपास करीत आहेत.
