आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

१२ लाखांची खंडणी मागणारा ‘सावकार’ गजाआड

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 11, 2021
Spread the love

खंडणीविरोधी पथकाची कारवाई : चक्क २४० टक्के वार्षिक व्याजदर आकारत होता

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : महिना १५ ते २० टक्के व्याजावर कर्ज देऊन त्यावर दररोज १० हजार रुपये दंडाच्या नावाखाली खंडणी उकळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खंडणी विरोधी पथकाने अशा सावकाराच्या मुसक्या आवळल्या आहेत.

विनोद राम शिंदे (वय ५६, रा. रास्ता पेठ) असे या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी पियुष शहा यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पियुष शहा यांनी सावकार शिंदे याच्याकडून जून २०२० मध्ये २ लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यावर शिंदे याने प्रति महा १५ ते २० टक्के दराने व्याज लावले होते. शहा यांनी जून २०२० ते सप्टेबर २०२१ पर्यंत रोख व गुगलपेद्वारे व्याजापोटी २ लाख ८० हजार रुपये दिले. त्यानंतर शहा हे हप्ता देऊ शकले नाही. त्यामुळे शिंदे याने शहा यांना शिवीगाळ व दमदाटी करुन सप्टेबर २०२१ पासून आतापर्यंत प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये व २ हजार रुपये दंड असा सर्व मिळून १२ लाख रुपयांची मागणी केली. शहा यांनी खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रार अर्जाची तपासणी केल्यावर शिंदे याने खंडणी मागितल्याचे समोर आले. पोलिसांनी शिंदे याला अटक केली. अधिक तपासासाठी त्याला समर्थ पोलिसांच्या हवाली केले आहे.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, विनोद साळुंके, सैदोबा भोजराव, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.