सायबर पोलिसांची कामगिरी : ५४ लाख ५० हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेले चेकबुक जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : नायझेरीयन आरोपींना फसवणुकीकरिता बँक खाते वापरण्यास देणाऱ्याच्या सायबर पोलिसांनी दिल्ली येथून मुसक्या आवळल्या. महिलेला २१ सप्टेंबर ते मार्च २०२१ दरम्यान, तीन कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याच्याकडून ५४ हजार ५० रुपये, बँक खात्याचे चेकबुक जप्त केले.
निमराज राजेश राजन (वय २७, रा. ४३-ए, सैनिक एनक्लेव्ह, सेक्टर-५, गल्ली नं.११, मोहन गार्डन, उत्तमनगर, पश्चिम दिल्ली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
महिलेने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित तपासाची गती वाढविली. नायझेरियन आरोपींना बँक अकाउंट पुरविणाऱ्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नवी दिल्ली येथील आरोपीच्या राहत्या घरातच ७ डिसेंबर २०२१ रोजी पकडून त्याच्या ताब्यातून ५४ हजार ५० रुपये व गुन्ह्यात वापरलेल्या बँक खात्याचे चेकबुक असा मुद्देमाल जप्त केला.
खासगी कंपनीमध्ये उच्चपदावर नोकरी करणाऱ्या ६० वर्षीय महिलेची अज्ञात व्यक्तीशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्याने महिलेला इंटरनॅशल फोनद्वारे संपर्क करून महागडे गिफ्ट पाठवल्याचे सांगितले. गिफ्ट घेऊन येत असताना एअरपोर्ट येथे त्याला अडविले असून, गिफ्टमधील सोन्याचे दागिने व फॉरेन करन्सी पार्सल क्लीअर करण्याच्या बहाण्याने, त्यातून सोडविणे, वैद्यकीय उपचार सुविधा यासाठी महिलेकडून २१ सप्टेंबर ते मार्च २०२१ दरम्यान २५ बँकांमधील ६७ बँक अकाउंट्सवर तीन कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपये भरावयास लावून आर्थिक फसवणूक केली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले, आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, कुमार घाडगे, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, सचिन गवते, पोलीस अंमलदार अस्लम आत्तार, मंगेश नेवसे, योगेश वाव्हळ, नितेश शेलार, प्रवीणसिंग राजपूत, शिरीष गावडे, प्रसाद पोतदार, दिनेश मरकड, महिला अंमलदार अंकिता राघो यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ऑनलाइन पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करणाऱ्या अनोळखी व बक्षीस, नोकरी, लॉटरी, कर्ज मंजुर करण्याच्या आमिष दाखविणाऱ्या गुन्हेगारी टोळक्यापासून नागरिकांनी सावध राहावे. तसेच स्वतःचे बँक खाते, स्वतःच वापरून कोणीही अनोळखी अथवा विदेशी नागरिकांना भारतीय लोकांचे बँक खाते वापरण्यास न देण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी केले आहे.
