कोथरूड पोलिसांत फिर्याद : सुतारदरा येथे घडली होती घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोथरुडमधील सुतारदरा येथे कट्ट्यावर बसला म्हणून एका टोळक्याने कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार ७ डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला.
याप्रकरणी सचिन दत्तात्रय नवस्कर (वय ३१, रा. मराठा मावळ कॉलनी, सुतारदरा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश मांझीरे, समीर पडवळ, रोहित ढोकणे (सर्व रा. सुतारदरा, कोथरुड) यांच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन नवस्कर हे घराजवळील जाधव पिठाच्या गिरणीजवळ रात्री उशिरा बसले होते. यावेळी आरोपी हातात कोयते घेऊन तेथे आले. गणेश मांझीरे याने फिर्यादी यांना काही कारण नसताना तू या चौकात का बसला असे बोलून शिवीगाळ केली.
समीर पडवळ व रोहित ढोकणे याने त्याची गचांडी पकडून त्यांना गणेश कॉलनीकडे ओढून नेत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गणेश मांझीरे याने त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. सचिन नवस्कर यांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी फिर्याद दिली असून पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
