अपघातानंतर ट्रकचालक फरार : निगडीतील पवळे ब्रिजवर घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची धडक एका दुचाकीला बसली. यामध्ये दुचाकीवरील होमगार्डचा मृत्यू झाला. हा अपघात पिंपरी चिंचवडमधील निगडी येथील पवळे ब्रिजवर रविवारी (दि.12) सकाळी साडेआठच्या सुमारास झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता निघून गेला.
तेजस ओमप्रकाश लेले (वय-32 रा. माळीनगर, वडगांव मावळ, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या होमगार्डचे नाव आहे. याप्रकरणी तेजसचा आत्येभाऊ देवेंद्र अरुण कुरुमभट्टी (वय-35 रा. गणेश हौसिंग सोसायटी, जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, तेजस हे होमगार्ड होते. ते निगडी येथील पवळे उड्डाणपुलावरुन रविवारी (दि.12) सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकची धडक तेजसच्या दुचाकीला बसली. यामध्ये तेजस यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी न थांबता निघून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
