आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भररस्त्यात पत्नीचा निर्घृण खून : आरोपी काही तासांत जेरबंद

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • May 26, 2026
Spread the love

बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात रविवारी सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. चारित्र्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने भरदिवसा रस्त्यातच पत्नीला अडवून धारदार हत्याराने गळा, मान आणि पोटावर सपासप वार करत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बार्शी-परांडा रोडवरील प्रविण हॉटेल परिसरात घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद करत गुन्ह्यातील रक्ताने माखलेले हत्यारही जप्त केले आहे.

मृत महिला धनश्री ऋषीकेश पाटील या बचत गटाचे काम करून लक्ष्याचीवाडी गावाकडून ज्युपिटर दुचाकी (MH-13 FA-4016) वरून बार्शीकडे परत येत होत्या. सकाळी सुमारे १०:१५ वाजण्याच्या सुमारास त्या प्रविण हॉटेलजवळ पोहोचताच आरोपी पती ऋषीकेश संभाजी पाटील (रा. नागणे प्लॉट, परांडा रोड, बार्शी) याने त्यांना अडवले. दोघांमध्ये काही क्षण वाद झाल्यानंतर आरोपीने अचानक धारदार हत्यार बाहेर काढत पत्नीवर जीवघेणा हल्ला चढवला.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार आरोपीने कोणतीही दया न दाखवता महिलेच्या गळ्यावर, मानेवर आणि पोटावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेला पाहून परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेश माने आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी महिलेला तातडीने ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषित केले.

घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी तातडीने दोन विशेष पथके तयार करून शहर व परिसरात शोधमोहीम राबवली. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि वेगवान हालचालींच्या जोरावर आरोपीला काही तासांतच पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यार लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार फिंगरप्रिंट पथक, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने वैज्ञानिक पद्धतीने सदर हत्यार जप्त करण्यात आले.

याप्रकरणी फिर्यादी जितेंद्र विश्वनाथ गायकवाड (रा. कासारवाडी, ता. बार्शी) यांच्या तक्रारीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. १५१/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अतिरिक्त बार्शी उपविभागीय पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर पोलीस निरीक्षक संजय जगतापआणि बार्शी शहराचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या धडाकेबाज कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, पोउनि. चंद्रकांत घोळवे, एएसआय सदाशिव गवळी, पोहेकॉ. राजेंद्र मंगरुळे, धनराज केकाण, अभय उंदरे, सुभाष सुरवसे, महिला पोहेकॉ. स्वाती काटे, बालाजी हांगे, लोंढे, खांडेकर, दशरथ बोबडे, अमित घाडगे, राहुल बोंदर, नगानाथ आंधळे, सुरेश बिरकले, ओमप्रकाश दासरे, गोविंद बचुटे आणि शिवशंकर खराडे यांनी सहभाग घेतला.