आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कारसह पती-पत्नी थेट विहिरीत, पत्नीचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 15, 2021
Spread the love

शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : पत्नीला कार शिकवताना सुटला ताबा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पत्नीला कार शिकवत असताना कारवरील ताबा सुटल्याने कारसह पती-पत्नी विहिरीत पडून पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. करंदी (ता. शिरुर, जि. पुणे) येथे मंगळवारी (दि. १४ डिसेंबर २०२१) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

वर्षा दिपक आदक (वय ३०, रा. शेखर हाईट्स सोसायटी, ता. शिरुर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दिपक प्रभाकर आदक (वय ३६) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी दिपक हे कार घेऊन पत्नी वर्षा हिला कार शिकवण्यासाठी केंदूर रस्त्यावरील करंदी गावातील पऱ्हाडवाडी रोडवर गेले होते. त्यावेळी समोरून दुचाकी आल्याने त्यांनी पत्नीला ब्रेक दाबण्यास सांगितले. मात्र पत्नीने ब्रेक दाबण्याऐवजी एक्सीलेटरवर पाय दिल्याने कारवरील ताबा सुटला. कारवरील ताबा सुटल्यानंतर गाडी शेजारील विहिरीत जाऊन कोसळली.

दिपकने तातडीने वर्षाच्या बाजूच्या काचेतून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला बाहेर येताच आले नाही. त्यामुळे दिपकने बाहेर येऊन पत्नीला बाहेर ओढून काढले.
त्यानंतर दिपकने पाईपला पकडून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. दिपकचा आवाज ऐकून रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरिकांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी दोघांना बाहेर काढले. मात्र, वर्षाचा जागीच मृत्यू झाला होता.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच करंदीच्या पोलीस पाटील वंदना साबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल ढेकणे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, पोलीस नाईक विकास पाटील, राहुल वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप कारंडे व विकास पाटील पुढील तपास करीत आहेत.