आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पैशांसाठी मुलींसह पती-पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्याला फाशीची शिक्षा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 15, 2021
Spread the love

आरोपी १२ वर्षे फरार होता : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडली होती घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कल्याणीनगर भागातील प्रिन्स्टन टाऊन सोसायटीत १३ आणि ९ वर्षाच्या मुलींसह पती-पत्नीचा खून केल्याची घटना घडली होती. कुटुंबातील चार जणांचा निर्घृण खून करणाऱ्या मुख्य आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांनी हे आदेश दिले आहे. ज्यावेळी गुन्हा घडला होता. त्यावेळी आरोपी २२ वर्षाचा होता. तर १२ वर्षे आरोपी फरार होता.

भागवत बाजीराव काळे (वय ४७, रा. भूम, जि. उस्मानाबाद) असे फाशी झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणात आरोपी काळे याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. खटला सुरु असताना त्याला येरवडा तुरुंगात नेत असताना त्याने पोलीस व्हॅनमधून पळ काढला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र तो सापडत नव्हता. अखेर 12 वर्षांनंतर तो सापडला. त्यानंतर खटल्याची सुनावणी सुरु झाली. यादरम्यान, अनेक साक्षीदार, तपासी अधिकारी अशा एकूण 20 जणांचे निधन झाले. खटल्याचा निकाल होईपर्यंत पंचांचाही मृत्यू झाला.

सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना म्हटले की, आरोपीने केलेला गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे. त्याने दोन लहान जिवांचा निर्दयीपणे खून केला आहे. चिमुकल्यांच्या अंगावर जवळपास 12 ते 20 जखमा होत्या. खून झालेल्या महिलेचे दातही आरोपीने तोडले असून, त्यांनी मुलगी व रमेश पाटील यांचा मृतदेह इमारतीच्या ड्रेनेजमध्ये कोंबला होता. आरोपींनी पैशांसाठी एका कुटुंबाला संपवले आहे. त्यांनी एक नाही तर चार खून केल्याने त्याला फाशीची शिक्षाच योग्य असल्याचा युक्तिवाद कावेडिया यांनी केला. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.