प्रगती फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम : घरपोच दिली जात आहेत पुस्तके
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रगती फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वाचकमित्र अभियान’ अंतर्गत नागरिकांकडून नोंदणी करण्यात आली होती. ज्यांनी नोंदणी केली अशांना पुस्तकाचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
४ ते ९ डिसेंबर या कालावधीत मोफत पुस्तक नोंदणीसाठी नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.आत्तापर्यंत एकूण 3487 पुस्तकांची नोंदणी करण्यात आली असून ( दि 12) पासून पुस्तक वितरणास सुरवात करण्यात आली. येत्या १० दिवसांच्या कालावधीत ही पुस्तके घरपोच पोचवण्यात येणार आहेत .
कात्रज, राजस सो. ,उत्कर्ष सो, शेलार मळा,सुखसागर नगर, कात्रज – कोंढवा रस्ता, गोकुळनगर, बिबवेवाडी परिसरातील नागरिकांना या अभियानांतर्गत प्रगती फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या पुस्तकांपैकी कुठलेही एक पुस्तक अगदी मोफत घरपोच देण्यात येणार आहे.
मोबाईलचा अतिवापर, इंटरनेटचा अतिरेक यामुळे लहान वयापासूनच मुले या डिजिटल युगात रमली पण या गोष्टींचा अतिरेक होऊन आता या मोबाईल तत्सम गोष्टींचे व्यसन मुलांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम करू पाहत आहे.
यातून थोडे बाहेर पडून सुसंस्कृत, सुशिक्षित समाजात साहित्य, संगीत, ललितकला आणि वैचारिक व वैज्ञानिक शास्त्रं यांविषयी विचार करून, इतरांनाही विचार करायला लावणाऱ्या वाचन संस्कृतीची एक अभिनव चळवळ उभी राहावी या उद्देशातून आम्ही हा उपक्रम राबविला असल्याचे प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतिक कदम यांनी यावेळी सांगितले.
आजची तरुण पिढी या मोबाईलच्या जाळ्यातून मुक्त व्हावी हा जरी आमचा प्रमुख उद्देश असला तरी घरातील प्रत्येक व्यक्ती व प्रत्येक वयोगटासाठीची पुस्तके आपण उपलब्ध करून दिली असून त्यातून संपूर्ण कुटुंबालाच वाचकमित्र करून घेण्याचा आमचा संकल्प असल्याचे कदम यांनी प्रतिपादन केले.
तसेच रक्तदान, मोफत आरोग्य शिबीर व बालगोपाळांसाठी बालजत्रेचे देखील आयोजन करण्यात आले होते.
