आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

घरफोडी करणाऱ्या शिकलकरी टोळीच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 17, 2021
Spread the love

कोंढवा पोलिसांची कामगिरी : १६ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडी चोरी करणाऱ्या शिकलकरी टोळीतील चोरट्यांच्या कोंढवा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपींकडून १६ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून १६ गुन्हे उघडकीस आणण्यात कोंढवा पोलिसांना यश मिळाले आहे.

करणसिंग रजपुतसिंग दुधानी (वय २५), बच्चनसिंग जोगिंदरसिंग भोंड (वय २२, दोघे रा. अंध शाळेच्या पाठीमागे, रामटेकडी, हडपसर, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, रामटेकडी येथे २८ नोव्हेंबर २०२१ रोजी घरफोडी करून नऊ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू होता. घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचून संशयावरून आरोपींना ताब्यात घेत एक चारचाकी, दोन दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, गाडीची बॅटरी, घरातील नळ असा एकूण १३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अधिक तपास केला असता आरोपीकडून १६ गुन्हे उघडकीस आणण्यात कोंढवा पोलिसांना यश मिळाले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे, कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार रमेश गरुड, पोलीस नाईक ज्योतिबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, सतीश चव्हाण, पोलीस शिपाई लक्ष्मण होळकर, किशोर वळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस स्टेशनच्या पथकाचे विशेष अभिनंदन केले.