आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

नराधम कांबळेला फाशीची शिक्षा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • June 29, 2026
Spread the love

पुणे : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव प्रभाकर कांबळे याला विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

नसरापूर येथील ही घटना १ मे रोजी घडली होती. या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांनी करून अवघ्या १५ दिवसांत १,२०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.

त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्यात आला. अवघ्या १६ दिवसांत ५५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने गेल्या गुरुवारी भीमराव कांबळे याला दोषी ठरविले होते.

शिक्षेबाबत युक्तिवाद करताना त्यांनी हा खटला ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचे नमूद करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील विविध १२ निकालांचे संदर्भ न्यायालयासमोर सादर केले. आरोपीने नियोजनपूर्वक मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा खून केल्याचे सरकार पक्षाने न्यायालयात मांडले.

सोमवारी सकाळी भीमराव कांबळे याला न्यायालयात हजर करण्यात आले. सकाळी ११ वाजता विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी निकालाचे वाचन सुरू केले.