पुण्यातील पॉल हॉटेलमधील घटना : आत्महत्या केल्याचा बनाव उघड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लग्नास नकार दिल्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची घटना पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात उघडकीस आली आहे. अगोदर प्रियकराने प्रेयसीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात तरुणीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. हा प्रकार बेंगलोर महामार्गावरील ओयो टाऊनहाऊस हॉटेल येथे गुरुवारी (दि.16) रात्री 10.30 च्या सुमारास घडला होता.
हेमंत अशोक मोहिते (वय-29 रा. तळबीड, ता. कराड, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सपनाचे वडील अशोक नारायण गवारे (वय-54) यांनी वाकड पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.17) फिर्याद दिली आहे. सपना अशोक गवारे (वय-27 रा. तुकाराम नगर, मुपो वाशी उस्मानाबाद) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. सपना ही एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती असं समजतंय.
पोलिसांनी सांगितले की, सपना आणि हेमंतचे एकमेकांवर प्रेम होते. ते पिंपरी-चिंचवडमध्ये दोन दिवसांपूर्वी ओयो हॉटेल टाऊन येथे राहण्यास आले होते. रुम नं. 301 मध्ये दोघेजण थांबले होते. दरम्यान, हेमंत हा सपनाकडे लग्नासाठी तगादा लावत होता. त्याला सपनाने नकार दिला. याच रागातून हेमंतने बाथरुमध्ये सपनाचा स्कार्फने गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने सपनाने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.
शवविच्छेदन अहवालामुळे बनाव उघड
घटनेनंतर सपनाला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु शवविच्छेदन अहवालात तिचा गळा आवळल्याचे निष्पन्न झाले. तसेच घटनास्थळावर झटापटीत बाथरुमची खिडकी तुटलेली होती. घटनास्थळाची परिस्थिती पाहता पोलिसांना खून झाल्याचा संशय आला. अखेर पोलिसांचा संशय खरा ठरला. शवविच्छेदन अहवालामुळे आरोपी हेमंतने रचलेला आत्महत्येचा बनाव उघड झाला. पुढील तपास वाकड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लोहार करीत आहेत.
