आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

धडाधड १० गोळ्या झाडून गुन्हेगार योगेश जगतापचा खात्मा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 20, 2021
Spread the love

आरोपी पिस्तूल सोडून पळाले : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रचंड खळबळ

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणावर गोळीबार करुन खून केल्याची घटना शनिवारी (दि. १८) सकाळी दहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात घडली आहे. या गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



योगेश रवींद्र जगताप असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. योगेश जगताप याच्यावर तब्बल 10 गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दत्त जयंती असल्याने काटे पुरम चौकात योगेश जगताप उपस्थित होता. तेव्हा त्याच्यावर अचानक गोळीबार करण्यात आला. दोन अज्ञात हल्लेखोरांनी योगेशवर बेछूट गोळीबार करत होते, असे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पहायला मिळत आहे. या घटनेत जगताप हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगवी पोलिसांनी दिली. अद्याप खुनाचे कारण समजू शकले नसून आर्थिक व्यवहारातून खून झाल्याची चर्चा आहे.

गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. रस्त्यावरील दुचाकीचालकाला पिस्तुलाचा धाक दाखवून त्याची दुचाकी पळवून नेली. आरोपींनी निळ्या रंगाची अ‍ॅक्टिव्हा (एमएच 12 पीजे 1832) दुचाकी पळवून नेल्याचे पोलिसांनी सांगितले.

पेट्रोल पंपावर पिस्तुल पडले. आरोपी गोळीबार करुन घटनास्थळावरुन पसार झाले. पळून जाताना त्यांनी एकाला पिस्तुलाचा धाक दाखवून दुचाकी पळवली. भोसरी-नाशिक रोडवरून जात असताना दुचाकीत पेट्रोल नसल्याने ते पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेले. त्याठिकाणी त्यांच्या दुचाकीला धडक बसल्याने आरोपीच्या हातात असलेले पिस्तुल खाली पडले. घाबरलेल्या आरोपींनी पिस्तुल त्याच ठिकाणी सोडून पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.