सासवड–जेजुरी मार्गावर भीषण अपघात
भरधाव ट्रक दिंडीत घुसला : तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू, चार जणी गंभीर जखमी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : आषाढी वारीदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सोमवारी सकाळी सासवड–जेजुरी मार्गावर अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान केलेल्या पालखीसोहळ्यात भरधाव ट्रक दिंडीत घुसल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे संपूर्ण वारकरी संप्रदायात शोककळा पसरली आहे.
ही दुर्घटना पुरंदर तालुक्यातील बेलसर टोलनाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर तसेच भोंगळे मळा परिसरात घडली.
प्राथमिक माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील ह.भ.प. रंगनाथ महाराज पोखरबिसीकर यांच्या दिंडीचा ट्रक अचानक अनियंत्रित झाला आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील महिला वारकरी चालत असलेल्या दिंडीवर घुसला.
या भीषण धडकेत महिलांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. सहकारी वारकरी, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.
जखमी महिलांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी पंचनामा करून अपघाताचा तपास सुरू केला आहे.
ट्रक अनियंत्रित होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चालकाची चौकशी सुरू आहे. तसेच वाहनाचा वेग, ब्रेक निकामी होणे किंवा अन्य तांत्रिक बिघाड यांसह सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे.
दरवर्षी लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूरकडे प्रस्थान करतात. अशा पवित्र सोहळ्यात घडलेल्या या भीषण दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत असून, जखमी वारकऱ्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना सर्व स्तरांतून केली जात आहे. प्रशासनानेही पालखी मार्गावरील वाहनांच्या हालचालींबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
