बाबुलालजी बागमार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
२०६ रक्तदात्यांचा सहभाग : १४२ जणांची नेत्र तपासणी, ६ मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी मदत
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : स्वर्गीय बाबुलालजी बागमार यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त स्वारगेट येथील दादावाडी येथे आयोजित रक्तदान शिबिर सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठरले. रक्तदानासोबतच आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणीच्या माध्यमातून अनेक गरजू नागरिकांना मदतीचा हात देण्यात आला. या शिबिराला रक्तदात्यांसह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरात एकूण २०६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. वैद्यकीय कारणांमुळे ४६ जणांचे रक्त संकलित करता आले नाही. रक्तदानासोबतच आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य उपक्रमांतर्गत १४२ जणांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
तसेच ६ जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी मदत करण्यात आली. या सेवाभावी उपक्रमात बागमार परिवाराची रक्तदान टीम, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा समाजातील सेवाभाव, एकता आणि सामाजिक जाणिवेचे प्रतीक ठरला.
चातुर्मासानिमित्त विविध ठिकाणी गुरु भगवंतांचे मंगल प्रवेशाचे कार्यक्रम सुरू असतानाही या सेवाकार्यासाठी जैन समाजातील अनेक मान्यवर, व्यापारी बांधव, नगरसेवक विशाल धनवडे, मनीषाताई चोरबोले, मानसीताई देशपांडे, तसेच परिवारातील सदस्य, मित्रपरिवार आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“एक स्टेटस, एक फोन आणि दिलेली योग्य माहिती तीन जीवांचा आधार बनू शकते,” या भावनेतून समाजातील प्रत्येकाने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
