वानवडीतील लगडबाबाजवळ कारवाई : गुन्हे शाखेच्या दरोडा वाहनचोरी विरोधी पथक-२ची कामगिरी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी आरोपींकडून 3 लाख 27 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाकी आणि एक चारचाकी गाडी जप्त केली आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लगडबाबा मठाजवळ कारवाई केली.
पप्पु नेकाराम चौधरी (वय-20 रा. दर्शननगर, पुनावळे, पिंपरी चिंचवड मुळ रा. मु.पो. सादडी, ता. देसुरी, जि. पाली राजस्थान), सतिश अमरसिंह पवार (वय-23 रा. मु.पो. मारुंजी ता. मुळशी मुळ रा. मु.पो. काळीदौलत ता. महागांव जि. यवतमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी हडपसर, कोंढवा, कोथरुड, चतु:श्रृंगी, वाकड, तळेगाव दाभाडे, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहने चोरल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी सांगितले की, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक वाहन चोर आणि सराईत गुन्हेगारांचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिसांना दोन सराईत वाहन चोर वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लगडबाबा मठाजवळ असून, त्यांच्याकडे असलेली होंडा शाईन दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी 8 दुचाकी आणि एक चारचाकी गाडी चोरल्याची कबुली दिली.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार राजेश अभंगे, राजेश लोखंडे, विनायक रामाणे, शिवाजी जाधव, गणेश लोखंडे, सुदेश सपकाळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
