आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वडिलांनी मारहाण करून मुलाचा केला खून

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 27, 2026
Spread the love

पुणे : श्रावणात दारू पिऊन येऊन मांसाहारी जेवण मागितल्याने झालेल्या भांडणात वडिलांनी मारहाण करून मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच, ही बाब आईने लपवून ठेवल्याचेही समोर आले आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली आहे.

महेश भागवत गायकवाड (वय ३०, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) आणि पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) अशी अटक केलेल्या आई-वडिलांची नावे आहेत. याबाबत त्यांचा दुसरा मुलगा गणेश भागवत गायकवाड (वय ३४, रा. रामनगर, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना त्यांच्या राहत्या घरी २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहानंतर ते पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश गायकवाड हे पेंटिंगचे काम करतात. त्यांचे आई-वडील आणि लहान भाऊ शेजारीच वेगवेगळे राहतात. त्यांचा लहान भाऊ महेश गायकवाड हा काही कामधंदा करत नव्हता. महेश याचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता.

महेश याच्या दारूच्या व्यसनामुळे त्याची पत्नी दोन मुलांना घेऊन माहेरी निघून गेली. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला. महेश हा एकटा राहत असून, जेवणासाठी आई-वडिलांकडे जात असे. तो काहीच कामधंदा करत नसून दारू पिऊन येतो, या कारणावरून त्याचे वडिलांबरोबर सतत भांडणे होत होती.

दारू पिऊन आल्यानंतर त्याला जेवणासाठी कायम मांसाहार लागत असे. श्रावण सुरू असल्याने आई-वडील मांसाहार बनवून देत नसल्याने त्यांच्यात वादावादी होत होती.

२४ ऑगस्ट रोजी महेश हा रात्री दारू पिऊन आला. तो रात्री साडेदहा वाजता घरी गेला. त्यानंतर पहाटे साडेचार वाजता त्याची आई पार्वती हिने फिर्यादी गणेश यांना झोपेतून उठवून, ‘महेश उठत नाही. त्याचे शरीर पूर्ण थंड पडले आहे. तू बघ जरा, त्याला काय झाले आहे,’ असे सांगितले. त्यांनी आईसोबत महेशच्या घरी जाऊन पाहिले.

महेश उताणा झोपलेला दिसून आला. त्याला उठवण्यासाठी डोक्याखाली हात घातला असता त्यांच्या हाताला रक्त लागले. तसेच, त्याच्या डोक्याला, नाकाला व तोंडाला जखमा झालेल्या दिसत होत्या. गळ्याभोवती व्रण असल्याचे गणेश यांना दिसले. त्यांनी नातेवाईकांना बोलावून घेतले.

नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. शवविच्छेदनात डॉक्टरांनी महेशचा मृत्यू श्वसनावरोधामुळे तसेच डोक्यावरील व चेहऱ्यावरील जखमांमुळे झाल्याचे सांगितले.

दारू पिऊन आल्यानंतर मांसाहारी जेवणावरून वडील भागवत गायकवाड आणि महेश यांच्यात भांडण झाले होते. त्यामुळे वडिलांनी त्याला डोक्यावर व तोंडावर मारहाण करून जखमी केले आणि गळा दाबून त्याला जीवे ठार मारले असावे. तसेच, झालेला प्रकार कसा घडला, हे आई पार्वती आणि वडील भागवत गायकवाड यांनी लपवून ठेवले असल्याचे फिर्यादी गणेश गायकवाड यांना वाटत आहे. पोलीस निरीक्षक प्रकाश देंडे तपास करीत आहेत.