ससून रुग्णालयातील क्लार्क महिलेच्या पतीला अटक
शिपाई, क्लार्कपदी नोकरीचे आमिष : ४ तरुणांची ९ लाखांची फसवणूक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : ससून रुग्णालयात शिपाई, क्लार्क पदावर नोकरी लावण्याच्या आमिषाने चार तरुणांची नऊ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बंडगार्डन पोलिसांनी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पतीला अटक केली आहे.
याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. श्याम अशोक खैरे (वय ३६) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. दीपाली श्याम खैरे (दोघे रा. ससून क्वार्टर, सोमवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण लष्कर भागातील दस्तूर शाळेजवळ राहतो. आरोपी दाम्पत्याशी त्याची गेल्या वर्षी ओळख झाली होती.
दीपाली खैरे या ससून रुग्णालयात क्लार्क आहेत. त्यांनी आणि श्याम खैरे यांनी तरुणाला ससून रुग्णालयात शिपाई पदावर कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले.
तसेच आणखी तीन तरुणांना क्लार्क पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यांच्याकडून प्रत्येकी दोन लाख रुपये घेतले. तरुणाने नोकरीबाबत आरोपी दाम्पत्याकडे विचारणा केली.
तेव्हा दाम्पत्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलिसांकडे आतापर्यंत चार जणांच्या तक्रारी आल्या असून, त्यांची नऊ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. पतीला अटक करण्यात आली आहे. हा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण करीत आहेत.
