आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

हर्षल बॅक्वेट हॉलच्या मालकांवर गुन्हा दाखल

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • October 8, 2026
Spread the love

पुणे : हर्षल हॉल येथील भाड्याने दिलेल्या किचन, ऑफिसचा दरवाजा तोडून आत प्रवेश करून तेथील साहित्य बाहेर काढून जागेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोथरूडमधील हर्षल बॅक्वेट हॉलच्या मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

शाम हरीविलास कासट (वय ७०) आणि सिद्धार्थ शाम कासट (वय ४२, दोघे रा. बॅक्वेट हॉल, कोथरूड) व इतर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत श्रीपाद प्रकाश चव्हाण (वय ४४, रा. सरगम बिल्डिंग, नांदेड सिटी) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २३ सप्टेंबरपासून ३ ऑक्टोबरपर्यंत घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीपाद चव्हाण यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. २०१९ मध्ये त्यांनी हर्षल बॅक्वेट हॉल येथील इनडोअर केटरिंगसाठी ४० लाख रुपये डिपॉझिट देऊन व्यवसाय सुरू केला.

त्यांनी वेळोवेळी भाडेकरारनामा करण्याची विनंती केली होती. परंतु, त्यांनी टाळाटाळ केली. २०२२ पासून शाम कासट यांनी १५ वर्षांचा तोंडी करार करून त्यांना दर महिन्याला भाडेपट्टा पावती देत गेले.

सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. त्यांच्या फर्मचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालत होता. त्यामुळे त्यांचा केटरिंग व्यवसाय बळकावण्याच्या भावनेने जागामालकांनी त्यांच्या स्टाफला आमिष देऊन त्यांच्याकडे नोकरी करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करण्यात आला आहे.

तो प्रयत्न फसल्यामुळे कासट यांनी ५ सप्टेंबर २०२६ रोजी कोणतीही पूर्वकल्पना न देता फिर्यादी यांना केटरिंग व्यवसाय थांबविण्याच्या आशयाची नोटीस दिली.

त्यावर फिर्यादी यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी लेखी आक्षेप नोंदवला. तेव्हापासून त्यांनी फिर्यादी यांना जागेत जाण्यास मज्जाव करण्यासाठी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली.

किचन आणि ऑफिसचा ताबा फिर्यादी यांच्याकडे असतानादेखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना धमकी, शिवीगाळ व मारहाण करून किचन व ऑफिसच्या चाव्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शाम कासट, सिद्धार्थ कासट व त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांनी मिळून किचनचा दरवाजा लोखंडी रॉडने तोडून त्यातील उपकरणे, भांडी, कटलरी, फर्निचर व इतर साहित्याची तोडफोड व नासधूस केली.

सर्व सामान बाहेर काढून किचनच्या बाहेर ठेवले. हे फिर्यादी यांना समजल्यावर ते रात्री साडेदहा वाजता तेथे पोहोचले. त्यावेळी तेथील लोक टेम्पोमध्ये साहित्य भरून घेऊन गेले.

त्यांना ऑफिसमधील ३० ते ४० हजार रुपयांची रोकड व कागदपत्रे आढळून आली नाहीत. सहायक पोलीस निरीक्षक संदीप येसणे तपास करीत आहेत.