महिला पोलीस हवालदार निलंबित
मद्यप्राशन करुन विना नंबरप्लेटची चालवली कार : गुन्हा दाखल झाल्याने कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : रजेवर असताना शासकीय गणवेश परिधान करून मद्यप्राशन केले आणि विना नंबरप्लेटची बलेनो कार विरुद्ध दिशेने चालवली. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती फुटपाथवर धडकली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी महिला पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे.
अश्विनी फुलचंद केकाण असे निलंबित केलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे. सध्या त्यांची नेमणूक काळेपडळ पोलीस ठाण्यात होती.
अश्विनी केकाण यांनी २६ व २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन दिवसांची किरकोळ रजा घेतली होती. असे असतानाही शासकीय गणवेश परिधान करून मांजरी येथील नंदिनी टकलेनगर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर मद्य अथवा अंमली पदार्थांचे सेवन करून त्याच्या अंमलाखाली केकाण यांनी विना नंबरप्लेटची मारुती बलेनो कार विरुद्ध दिशेने चालवली.
त्यांनी समोरून येणाऱ्या वाहनांना कट मारले. मद्याच्या अंमलामुळे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी कार फुटपाथवर घातली. तसेच, समोरून येणाऱ्या वाहनचालकांना आणि नागरिकांना शिवीगाळ केली.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे मांजरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय सेवक म्हणून कर्तव्य बजावत असताना बेजबाबदारपणे वर्तन करणे, हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे आणि अंमली पदार्थांचे सेवन करून गैरवर्तन करणे, अशा कृत्यांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी अश्विनी केकाण यांना निलंबित केले आहे.
