आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बाप रे… 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणासह तिघांचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 29, 2021
Spread the love

कंटेनरचालक फरार : मुंबई-बंगलोर महामार्गावर नवले पुलाजवळ अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील मुंबई-बंगलोर महामार्गावर नवले ब्रीज जवळ पुन्हा भीषण अपघात झाला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो वेगाने पाठीमागे गेला आणि काही वाहनांना जाऊन धडकला. नवले ब्रीज जवळ झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये चेतन सोळंकी या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुळचा धुळ्याचा असलेला चेतन सोळंकी हा पुण्यातील एका कंपनीत कामाला आहे. चेतनचे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी लग्न झाले होते. नव्या नवरीला घेऊन तो पाच दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. नेहमीप्रमाणे सकाळी तो कामावर जाण्यासाठी निघाला. गाडीची वाट पाहत तो मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रीज जवळ उभा होता. कंपनीची गाडी त्याला नेण्यासाठी येण्यापूर्वीच ब्रेकफेल झालेला कंटेनर काळ बनून आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

चेतनच्या अंगाची हळदही पुसली नाही, तोच काळाने आळा घातला आणि नववधूसह आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नवले पुलाजवळ दररोज अपघात होत आहेत, तरीही महामार्ग आणि स्थानिक पालिका प्रशासन डोळ्याला झापड लावून गप्प बसले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

चेतनचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. चेतनला पाहण्यासाठी कुटुंब ससून हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मृतदेहाचे दोन तुकडे झालेल्या चेतनला ओळखणंही कठीण झाले. त्याच्या पश्चात दोन बहिणी असून, एका बहिणीचे लग्न झाले आहे. तर दुसऱ्या बहिणीचे लग्न झालेले नाही. तिच्या लग्नाची जबाबदारी चेतन याच्यावर होती. चेतनचा अपघातात मृत्यू झाला आहे हे त्याच्या पत्नीला कसे सांगायचे असा प्रश्न नातेवाईकांसमोर आहे. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस फरार कंटेनर चालकाचा शोध घेत आहेत.

get_footer();