पुण्यातील चिखलीमध्ये घडली घटना : ट्रक चालकावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सोसायटीत खेळत असलेल्या 2 वर्षाच्या चिमुकल्याला टॅंकरने धडक दिली आहे. ही घटना चिखली येथे ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या मेनगेटच्या समोर 31 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 च्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या धडकेमध्ये चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. जाधववाडी (चिखली, पुणे) येथील अंगाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.
मोहमद अदनान (वय 2) असं मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. याप्रकरणी रिजाजउद्दीन रोजअली मनियार (वय 24, रा.जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमेश मेहकर (रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीची आई त्यांचा नातू मोहमद अदनान याला सायकल खेळण्यासाठी घेऊन जात होत्या. त्यावेळी आरोपी सोमेश मेहकर हा पाण्याचा टॅंकर घेऊन आला. ऐश्वर्यम हमारा सोसायटीच्या मेन गेटच्या समोर आरोपीच्या टॅंकरचा मोहमद (चिमुकला) याच्या सायकलला धक्का लागला. या धक्क्याने मोहमद हा टँकर खाली चिरडला गेला. त्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आरोपी सोमेशने पळ काढला. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
