गृह मंत्रालयाकडून गाईडलाईन जारी : वैयक्तिक माहिती आणि बँकेची माहिती देऊ नका
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असताना ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याच काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गृह मंत्रालयाने सायबर गुन्ह्यांबाबत एक गाईडलाईन जारी केली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने सायबर भामटे ओमिक्रॉनच्या मोफत चाचणीच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत.
गृह मंत्रालयाच्या सायबर आणि माहिती सुरक्षा विभागाने एक सूचना जारी केली आहे. यात म्हटले की, आरोग्य संकटावर लक्ष केंद्रित केल्यामुळे सायबर सुरक्षेत दुर्लक्ष केले जात आहे. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहे. सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वेगवगळ्या मार्गाचा वापर करत आहे. सध्या ओमिक्रॉन प्रकाराबाबत सायबर गुन्हे वेगाने वाढत आहेत. त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता सायबर गुन्हेगार नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत.
गृह मंत्रालयाने पुढे म्हटले की, ओमिक्रॉनची आरटीपीसीआर चाचणी संदर्भात ई-मेल पाठवले जात आहेत. यामध्ये लोकांचा डेटा चोरणाऱ्या लिंक्स आणि फाईल्स आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकारी आणि खासगी आरोग्य सेवांच्या नावाचा वापर करुन जनतेची फसवणूक केली जात आहे. आरटीपीसीआर चाचणीसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करुन लोकांना ठगांनी तयार केलेल्या बनावट वेबसाईटवर नेले जाते. जी सरकारी किंवा खासगी आरोग्य सेवांच्या वेबसाईटसारखीच दिसते.
सायबर गुन्हेगार लोकांची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील मिळवतात आणि लोकांची फसवणूक करतात. वेबसाईट खरी आहे की बनावट हे जाणून घेण्यासाठी सरकारने लोकांना डोमेन नाव आणि यूआरएल तपासण्याचा सल्ला दिला आहे. अशा कोणत्याही घटनेची माहिती cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.














