येरवडा पोलीस आणि सायबर पोलिसांनी केला तपास : कंपनीतीलच कर्मचाऱ्याचे कर्मकांड
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कंपनीच्या कर्मचाऱ्याने बनावट आर्थिक व्यवहार करीत कंपनीची तब्बल एक कोटी 22 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल होताच पोलिसांनी तत्काळ संबंधित कंपन्यांशी संपर्क साधून कंपनीचे 77 लाख रुपये वाचविले. सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आर्थिक नुकसान टळले.
याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. त्याचबरोबर सायबर पोलिसांकडेही तक्रार देण्यात आली होती.
येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये ए.एम.इन्फो वेब नावाची कंपनी असून, कंपनीमधील कर्मचारी रोहीत जोगळेकर याने बनावट व्यवहार करून कंपनीची एक कोटी 22 लाख 13 हजार रुपयांची फसवणूक केली होती. फसवणूक झालेली रक्कम रोझरपे, मायट्रॅव्हल डॉट कॉम व अन्य कंपन्यांच्या खात्यावर जमा झाले होते. आर्थिक फसवणूक असल्याने सायबर पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून सायबर पोलिस ठाण्यात रात्रपाळीला कर्तव्यावर असणारे पोलिस कर्मचारी नवनाथ कोंडे यांनी पैसे वर्ग केलेल्या रेझरपे या कंपनीस तत्काळ ईमेल करून फसवणूक झालेले पैसे गोठविण्यास सांगितले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक बलभिम ननवरे, महिला पोलिस कर्मचारी उमा पालवे, पुजा मांदळे यांनी अन्य माय ट्रॅव्हल डॉट कॉम व अन्य कंपन्यांशी तत्काळ पत्रव्यवहार केला. त्यानंतर संबंधित कंपन्यांनी गोठविलेले पैसे परत फसवणूक झालेल्या कंपनीच्या बॅंक खात्यामध्ये जमा केले. सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे 77 लाख रुपयांची रक्कम परत मिळू शकली.
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायु्कत भाग्यश्री नवटके, पोलीस आयुक्त विजयकुमार पळसुले यांच्या मार्गदर्शनाकाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके, सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे, पोलीस नाईक, नवनाथ कोंडे, महिला पोलीस शिपाई उमा पालवे, पूजा मांदळे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
