विमानतळ पोलिसांत गुन्हा : कंपनीचा डाटा हॅक करून मोठे नुकसान करण्याची दिली धमकी
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अनोळखी व्यक्तींनी कंपनीचा डाटा हॅक करण्याची धमकी देऊन थेट बजाज फायनान्स कंपनीचे संजीव बजाज यांच्यासह तिघांना ईमेलद्वारे 11 कोटी 63 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. तसेच खंडणी दिली नाहीतर कंपनीचे मोठे नुकसान करु, अशी धमकी ईमेलद्वारे देण्यात आली आहे.
याप्रकरणी पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बजाज फायनान्सचे अधिकारी युवराज मोरे (वय-32 रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन ईमेल पाठविणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजीव बजाज, वरिष्ठ अधिकारी दीपक रेड्डी, दीपक बगाडी यांना 28 नोव्हेंबर रोजी या ईमेल वरुन एक संदेश पाठविण्यात आला होता. या मेलमध्ये आम्हाला 11 कोटी 63 लाख रुपयांची खंडणी द्यावी, अन्यथा कंपनीचा डाटा हॅक करुन कंपनीचे मोठे नुकसान करु, खंडणीची रक्कम डोजे कॉइन या चलनाद्वारे पाठवावी, असा मजकूर देण्यात आला होता. भारतीय चलनात अभासी चलनाचे मूल्य 11 कोटी 63 लाख इतके होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी सुरुवातीला सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर सायबर पोलिसांनी या प्रकरणाचा अर्ज विमानतळ पोलिसांकडे पाठवला. त्यावरुन अनोळखी व्यक्ती विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप करीत आहेत.














