वानवडी पोलिसांत फिर्याद : पती अजितकुमार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर, प्रचंड खळबळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : वानवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन एका विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि.11) दुपारच्या सुमारास घडली आहे. विवाहितेच्या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कल्याणी अजितकुमार प्रधान (वय-32) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. कल्याणी यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेची वानवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, वानवडी परिसरातील ड्रीम्स आकृती या उच्चभ्रू सोसायटीमध्ये कल्याणी आणि तिचे पती राहतात. तीन वर्षापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांचे पती अजितकुमार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. मंगळवारी दुपारी कल्याणी यांनी इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. कल्याणी यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकले नसून वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिस तपास करीत आहेत.
