गॅस कटरने फोडले एटीएम : चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, पोलीसांचा तपास सुरू
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : यवत (ता. दौंड, जि. पुणे) येथील महाबँकेच्या एटीएमवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात दरोडेखोरांनी गॅस कटरने एटीएम मशीन फोडून तब्बल 23 लाख रुपयांची रक्कम चोरुन नेली. पुणे-सोलापूर महामार्गालगत यवतमधील बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम सेंटरमध्ये ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी सांगितले की, यवत (ता. दौंड) गावातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएमवर काही अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. आरोपींनी गॅस कटरच्या सहाय्याने अलगदपणे एटीएम फोडले. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील तब्बल 23 लाख 81 हजार 700 रुपयांची रोकड पळवली. रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. पुणे ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणी एटीएम कॉन्ट्रॅक्टर विकास जालिंदर भगत यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना सूचना दिल्या. तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे व पोलीस पथकाने पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.
