चौघांना केले जेरबंद : पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : मध्य प्रदेशमधून पिंपरी चिंचवड शहर परिसरात विक्रीसाठी आणलेल्या टोळीकडून 14 पिस्टल आणि आठ जिवंत काडतुसे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पकडले. यामध्ये चार जणांना अटक केली असून, एका आरोपीकडून यापूर्वीदेखील 24 पिस्टल आणि 16 जिवंत काडतुसे पोलिसांनी पकडली होती.
आकाश अनिल मिसाळ (वय 21, रा. इंद्रायणीनगर, भोसरी), रुपेश सुरेश पाटील (वय 30, रा. वडगाव बुद्रुक, ता. चोपडा, जि. जळगाव), ऋतिक दिलीप तापकीर (वय 26, रा. सुतारवाडी, पाषाण), अजित उर्फ विकी रामलाल गुप्ता (वय 28, रा. भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, वडमुखवाडी येथे काहीजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्यावरून दरोडा विरोधी पथकाने 3 जानेवारी रोजी रात्री तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकी, दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, तीन मोबाईल फोन, मिरची पूड, नायलॉन दोरी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला. आरोपी एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्या गुन्ह्यात आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलीस कोठडीत असताना पोलिसांनी आरोपींच्या घराची झडती घेतली. त्यावेळी रुपेश पाटील आणि ऋतिक तापकीर यांच्या फ्लॅटमधून सहा गावठी कट्टे (पिस्टल) आणि जिवंत काडतूस मिळाले. तर आकाश मिसाळ याच्या घरातून चार गावठी कट्टे आणि जिवंत काडतूस मिळाले. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त केला.
आरोपी रुपेश पाटील याने भोसरी येथील अजित गुप्ता याला पिस्टल विकल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी सापळा लावून अजित गुप्ता याला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. यामध्ये पोलिसांनी एकूण 14 पिस्टल आणि आठ जिवंत काडतुसे असा एकूण चार लाख 90 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी रुपेश पाटील आणि अक्षय मिसाळ हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रुपेश पाटील आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वी देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. पूर्वीच्या कारवाईमध्ये रुपेश पाटील आणि टोळीकडून 24 पिस्टल आणि 16 जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्यानंतर देखील तो सुधरला नाही. त्याने पुन्हा मध्य प्रदेशातून पिस्टल आणून शहरात विकण्याचा काळा बाजार चालू केला. यामुळे त्याला पुन्हा एकदा जेलची हवा खावी लागली आहे.
रुपेश पाटील भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यात फरार होता. तर त्याच्यावर चिंचवड, देहूरोड आणि भोसरी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत. आरोपी आकाश मिसाळ याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अंमलदार महेश खांडे, उमेश पुलगम, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, गणेश कोकणे, राजेश कौशल्ये, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, राजेंद्र शिंदे, औदुंबर रोंगे, गोविंद सुपे, नागेश माळी, पोलीस हवालदार शेटे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली आहे.
दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार…
आरोपी रूपेश पाटील आणि अक्षय मिसाळ हे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. रूपेश आणि त्याच्या साथीदारांवर यापूर्वीदेखील पोलिसांनी कारवाई केली आहे. पूर्वीच्या कारवाईमध्ये रूपेश पाटील आणि टोळीकडून २४ पिस्तुले आणि १६ जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्याने पुन्हा मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून शहरात विक्री सुरू केली होती. रूपेश पाटील भोसरी आणि भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यातील दोन गुन्ह्यांत फरार होता. त्याच्यावर चिंचवड, देहू रोड आणि भोसरी पोलिस ठाण्यात पाच गुन्हे दाखल आहेत.
